ALL ABOUT ATPADI -

***History***
In 16th century Atapdi was part of Adilshahi kingdom of Bijapur. Later it was a part of princely state of Aundh as well as a palace city, hence it was called as Atpadi Mahal. After Indian independence and merging of Aundh into republic of India, Atpadi was in Khanapur Taluka in Satara district till new district, Sangali was formed. After formation of new district, Atpadi was separated from Khanapur Taluka and made a Taluka place itself. Prominent Marathi writers like G.D. Madgulkar, B.D. Madgulkar, Shankarrao Kharat are from this place.

*Geography*
Atpadi is a Taluka (Sub division of District) in Sangali District, Located at Latitude: 17° 25' 0 N, Longitude: 74° 57' 0 E. Atapdi is old styled town where town is divided into Galli's of different caste people, making it perfect Indian self-Dependent village.
Forest Area
Atpadi has a forest office, near Swatantrapur. Dubai Kuran (डबई कुरण) is reserved forest area.
*WHERE ABOUTS =
Surrounding area and villages
Bhingewadi:Bhingewadi is small Grampanchat Village 3 kilometers from Atpadi Town situated at north-west. Bhingewadi consists of farms of people whose surname is Bhinge, so the name Bhingewadi.Bhingewadi is a small village of 2000 people and farms in and around houses. Wheat, Jowar, Bajara, and pomegranate is main produce from the farm lands. Its adjacent to swatantrapur.
Deshmukhwaadi: Situated at south-east of Atpadi.
Ya.Pa. Wadi: Located on Atpadi-Sangola road
Mapate Mala: Located on Atpad-Nimbawade road, south-west Sonarsiddhnagar: Located on Atpadi-Kauthuli road.
* Swatantrapur : It is located in between Atpadi lake and Bhingewadi, it is a free custodian colony built in 1939. The Hindi cinema, 'Do ankhe baraah haath' is based on Swatantrapur.

Sunday 25 May 2014

धन्य तो 'औंधाचा राजा' ! त्यांना मानाचा मुजरा!.

धन्य तो 'औंधाचा राजा' ! त्यांना मानाचा मुजरा!."दो आँखें बारह हाथ" (Do Aankhen Barah Haath)
..........सुमित्र माडगूळकर यांचे फेसबुक अपडेट


कैद्यांना आपल्या कुटुंबासह राहता येते असे बहुतेक जगात दोनच तुरुंग आहेत.त्यापैकी एक आहे मॉरिशसला तर दुसरा आहे आटपाडी या सांगली जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात "स्वतंत्रपूर" ला!.

गदिमांचे 'औंधाचा राजा' हे व्यक्तिचित्रण तुम्ही कदाचित १० वी च्या पाठ्यपुस्तकात किंव्हा 'मंतरलेले दिवस' या पुस्तकात वाचले असेल,'औंधाचा राजा' अर्थातच औंध संस्थानचे राजे 'श्रीमंत भवानराव पंडित पंतप्रतिनिधि' एक 'जाणता राजा' होता,गुन्हा करणारा हा जन्मताच गुन्हेगार नसतो,एखाद्या अनाहूत क्षणी त्याच्या संयमाचा बांध सुटतो आणि एखादा भयंकर गुन्हा त्याच्या हातून घडतो,हा क्षण सोडला तर आपण आणि त्याच्यात काय फरक असतो?,हेच औंधाच्या राजाने जाणले व आपले मित्र गांधीवादी विचारवंत पोलंडचे मॉरिस फ्रिडमन ऊर्फ भारतानंद यांच्या संकल्पनेतून १९३९ साली जगातल्या या आगळ्या-वेगळ्या प्रयोगाची सुरवात झाली,आटपाडी पासून ५ कि.मी च्या आसपास असलेल्या "स्वतंत्रपूर" या कैद्यांच्या वसाहतीने.

जन्मठेप झालेला कैदी म्हणजे साखळदंड व बेड्या असे आपण हिंदी चित्रपटात नेहमी पाहतो,पण स्वतंत्रपूर येथे जन्मठेप भोगणार्‍या कैद्यांच्या हातात ना साखळदंड असतात ना बेड्या ना लोखंडी दरवाजा ना मनावर ओझे टाकणार्‍या उंचच्या उंच काटेरी भिंती!.घरच्या लोकांबरोबर राहण्याची मुभा,हा तुरुंग नाही तर बंदिवानांची वसाहत आहे.३० हेक्टर परिसरात पसरलेली ही वसाहत,इथे राहणारे गुन्हेगार इथेच असणार्‍या जमिनीवर शेती पिकवतात, प्रत्येकाला काही जमिन दिली जाते,यात त्यांनी अन्नधान्ये-भाजीपाला पिकवायचा व बाजारात तो विकून येणार्‍या उत्पन्नातून आपला व आपल्या सोबत आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवायचा.वसाहतीत कैद्यांना एकटे न ठेवता त्यांची बायका-पोरेही सोबत ठेवण्याची मुभा असते.कैदी स्व:ता बाजारात जातात,लोकात मिसळतात,सण-उत्सव साजरे करतात.कैद्यांना सामान्य वागणूक व मुक्त जीवन मिळाल्यामुळे त्यांचे ह्रदयपरिवर्तन होण्याची शक्यता असते ही या प्रयोगामागची भावना.औंध संस्थानच्या काळात कैद्यांना मोकळे सोडत नव्हते पण जर कैदी पळाला तर त्याला परत पकडत नसत.

एकदा काही कैदी पहाटेच्या सुमारास पळून गेले,कुठलेही गज,भिंती त्यांना अडवू शकत नव्हत्या पण त्यावेळी तीथे जेलर असलेले 'अब्दुल अजिज अब्दुल खलील काझी (मास्तर)' यांचे प्रेम,आदर,संस्कार,त्यांचा आदरयुक्त दरारा यांनी ते काम केले व पळालेले सगळे कैदी परत आले,त्यांनी मास्तरांचे पाय धरले "आम्ही चुकलो,आपणास सोडून आम्ही पळून जाऊ शकत नाही".असा हा औंधाच्या राजा चा अलौकिक प्रयोग!.

गदिमांचे माडगूळ गाव आटपाडी-स्वतंत्रपूर पासून खूप जवळ,गदिमांचे वडिल औंध संस्थानात कारकून होते,गदिमांचे काही शिक्षण पण औंधला झाले,गदिमांना या 'जाणत्या राजा' विषयी खूप आदर होता,ते राजाची नक्कल पण खूप सुंदर करत म्हणून गदिमांना त्या काळात 'औंधकर' या नावाने ओळखत असत.

शांताराम वणकुद्रे उर्फ व्ही.शांताराम मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या कर्तुत्वाने दरारा निर्माण करणारे एक आदरणिय व्यक्तिमत्व,प्रभात ते राजकमल कलामंदीर असा मोठा प्रवास,गदिमांना 'शाहिर रामजोशी' चित्रपटातून पहिल्यांदा संधी देणारे.शांतारामांच्या मनात एक क्लासिक हिंदी चित्रपट करण्याचे होते,मराठी चित्रपटातून गदिमांचे खूप नाव झाले होते,पूर्वीचा ऋणानुबंध होता,राजकमल कलामंदिर साठी एखादा चित्रपट लिहिण्यासाठी त्यांनी गदिमांना पाचारण केले,गदिमांनी 'स्वतंत्रपूर' ची माहिती त्यांच्या कानावर घातली,त्यांना तो विषय खूप आवडला व यावरच चित्रपट करावा असे ठरले,चित्रपटाच्या तयारीसाठी गदिमांनी माडगूळच्या 'बामणाच्या पत्र्यात' आपला मुक्काम हलवला,त्यांनी स्वतंत्रपूर चा इतिहास,परिसर,कैदी यांचा अभ्यास केला व चित्रपटाचे कथानक तयार केले.

"तरुण उमेदीचा 'जेल वॉर्डन' आदिनाथ हा एक वेगळा प्रयोग करण्याचे ठरवतो,पॅरोलवर असलेल्या ६ अतिशय धोकादायक कैद्यांना ज्यांनी खून केले आहेत असे भडकू माथ्याचे कैदी तो निवडतो,वरिष्ठांचा विरोध असून सुध्दा त्यांना पटवून देतो व स्व:ताच्या जवाबदारीवर त्यांना एका शेतवजा वसाहतीत घेऊन जातो,तीथे त्यांच्या कडून मेहनत करुन शेते पिकवून घेतो,वर उल्लेख केलेला कैदी पळून जाण्याचा व परत येण्याचा प्रसंग सुध्दा चित्रपटात घडतो,कैदी हळूहळू सुधारायला लागतात,त्यांनी पिकवलेली भाजी खूप उत्कृष्ठ दर्जाची होऊ लागते,बाजारात भाजी विकायला कैदी स्व:ता जातात,त्यांची सुंदर भाजी हातोहात विकली जाते,मात्र त्याने बाजारातले प्रस्थापित व्यापारी दुखावले जातात,कैद्यांना दारु पाजून भूलवायचा प्रयत्न करतात,आपल्या गुंडांमार्फत कैद्यांवर हल्ला करतात.सुरवातीला हाणामारी करणारे हे कैदी जेलरच्या संस्कारा मुळे गांधींजींच्या अहिंसा मार्गाने त्याचा विरोध करतात,जेलर त्यांना बाजारपेठेची माहिती करुन देतो,स्व:ताच्या हक्कांसाठी लढायला शिकवतो.

शेवटच्या प्रसंगात बाजारपेठेतले व्यापारी शेकडो बैल शेत उध्वस्त करण्यासाठी त्यांच्या शेतात सोडतात,त्यावेळी केवळ जेलर तिथे असतो,कैदी बाजारात गेले असतात,जेलर बैलांशी एकटा झुंज देतो,शेते वाचवायचा प्रयत्न करतो,खूप जखमी होतो,कैदी परत येतात पण जेलरचे प्राण गेलेले असतात,त्याचे बलिदान व्यर्थ जात नाही,कैदी तिथेच राहून या दुष्टप्रवृत्तींशी झुंजायचे ठरवतात व जन्माला येते एक स्वतंत्रपूर..."

१९५७ साली प्रदर्शीत झालेला "दो आँखें बारह हाथ" (Do Aankhen Barah Haath) हा चित्रपट,गदिमांचे अतिसुंदर कथानक,पटकथा,गदिमांचेच हिंदी संवाद,केवळ दोन डोळ्यांच्या जरबेने कैद्यांना जखडून ठेवणारा व्ही.शांताराम यांनी साकारलेला जेलर व त्यांचे अचंबित करणारे दिग्दर्शन,"ऐ मालिक तेरे बंदे हम" सारखी भरत व्यासांची गाणी,वसंत देसाईंचे संगीत,शांताराम-संध्या व सर्व कैद्यांच्या भूमिका करणार्‍या कलाकारांचा मनाला भिडणारा अभिनय,शेवटच्या बैलांच्या झूंजीच्या प्रसंगात तर व्ही.शांताराम मरता मरता वाचले होते,त्यांच्या डोळ्याला जखम झाली होती व दृष्टी थोडक्यात जाताजाता वाचली.

या चित्रपटात काय नव्हते?.नुसता भारतातच नाही तर जगभर हा चित्रपट खूप गाजला या चित्रपटाला भारतात व परदेशात National Film Awards - Best Feature Film, Best Feature Film in Hindi, Berlin International Film Festival - Silver Bear Extraordinary Prize of the Jury, OCIC Award,Golden Berlin Bear (Nominated), Golden Globe Awards,Samuel Goldwyn Awards सारखे अनेक पुरस्कार लाभले.

गदिमा हिंदी चित्रपटसृष्टीत खूप कमी रमले पण "दो आँखें बारह हाथ", "नवरंग", "तूफान और दिया","गुंज उठी शहनाई" सारखे अजरामर चित्रपट त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीलाही दिले!.

धन्य तो 'औंधाचा राजा' आणि धन्य ते गदिमा,व्ही.शांतारामांसारखे कलावंत!,त्यांना मानाचा मुजरा!.

विशेष आभार : श्री.विजय भास्कर लाळे,aundh.info

Sunday 23 February 2014

Barmahi Manganga (AWARD WINNING BLOG): एक व्यासपीठ माझ्या माणदेशातल्या लाखो लोकांसाठी,

Barmahi Manganga (AWARD WINNING BLOG): एक व्यासपीठ माझ्या माणदेशातल्या लाखो लोकांसाठी,: "बारमाही माणगंगा " हा केवळ एक ब्लॉग किंवा साहित्यिक लेख अगर बातम्यांचं दालन नाही, हे एक व्यासपीठ माझ्या माणदेशातल्या लाखो लोकांसा... एक व्यासपीठ माझ्या माणदेशातल्या लाखो लोकांसाठी,
"बारमाही माणगंगा " हा केवळ एक ब्लॉग किंवा साहित्यिक लेख अगर बातम्यांचं दालन नाही,
हे एक व्यासपीठ माझ्या माणदेशातल्या लाखो लोकांसाठी, या भागातून जाणारया माणगंगा, अग्रणी आणि येरळा या तीन
नद्यांचं भवितव्य यात सामावलं आहे. बारमाही माणगंगा हि एक मोहीम आहे, नद्या जिवंत आणि बारमाही वाहत्या करण्यासाठी चालवलेली.
यात कोणा एकट्या दुकट्याची मते नाहीत तर अनेक ज्ञात- अज्ञात जाणकार तसेच रूढ अर्थाने अज्ञानी सुद्धा माणसांनी
माणदेशातील नद्यांच्या पुनरुज्जीवना संदर्भात केलेला अभ्यास, मांडलेली मते, केलेले प्रयत्न आणि झालेले काम यांचा समावेश आहे. आपणही या चळवळीचा हिस्सा व्हा. प्रत्येक माणदेशी माणसाने आणि पाणी, पर्यावरण क्षेत्रात काम करणारयाने आवर्जून या व्यासपीठाचा वापर करावा.
आपला,
पत्रकार विजय लाळे,
फेसबुक संपर्क - https://www.facebook.com/vijay.lale.5
मोबाईलवर - 8805008957. किंवा व्हाटस अप वर 7387296578.

Monday 11 November 2013

Barmahi Manganga (AWARD WINNING BLOG): हिमालयाच्या कुशीत वसलेल्या लडाखमध्येही दुष्काळ का ...

Barmahi Manganga (AWARD WINNING BLOG): हिमालयाच्या कुशीत वसलेल्या लडाखमध्येही दुष्काळ का ...: आम्ही आहोत भगीरथाचे वारस = देशातला हा आणखी एका भगीरथाच्या वारसदाराची हि कहाणी … पहा आणि विचार करा… आपणही असे करू शकतो.… फक्त इच्छाशक्ती...

Tuesday 8 October 2013

कृष्णेचे पाणी माणगंगे मार्गे भीमा खोऱ्याला देण्यात यावे

 महाराष्ट्रात सध्य स्थितीत प्रकल्प निहाय पाणी वाटपाची बाब अडचणीची ठरत असल्याने राज्याने शोधलाय नवा पर्याय … …कृष्णा खोऱ्यातील  आपल्या वाट्याचे पाणी वाचवण्यासाठी राज्य सरकार ते दुष्काळ  प्रवण भीमा खोऱ्यात नेण्याची तयारी कृष्णा पाणी लवादासमोर दर्शविली आहे … 
माणगंगा नदी ही भीमा नदीच्या खोऱ्यातीलच नदी आहे …. मग कृष्णेचे पाणी  माणगंगे मार्गे भीमा खोऱ्याला देण्यात यावे … बारमाही माणगंगा पथकाची राज्य सरकारकडे मागणी। 

Wednesday 7 August 2013

दुष्काळाच्या दुष्टचक्रात अडकलेला माणदेश

Wednesday, 7 August 2013

दुष्काळाच्या दुष्टचक्रात अडकलेला माणदेश

दुष्काळाच्या दुष्टचक्रात अडकलेला माणदेश

****विजय लाळे ******

वाई-महाबळेश्वरला जोरदार पाऊस, कराड-पाटणात संततधार, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातली अनेक गावे पाण्याखाली,पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, कोयनेसह धोम, राधानगरी, नीरा देवधर, भाटघर धरणे भरली, सांगली जिल्ह्यात पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला… सध्या ऑगस्ट महिना सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्रासह संपूर्ण महाराष्ट्रात चांगला पाऊस पडत आहे. मात्र कायमस्वरूपी दुष्काळी भाग म्हणून ओळखला जाणारा माणदेश प्रांत अद्यापही पुरेशा पावसासाठी तरसला आहे. सातारा, सांगली आणि सोलापूर या तीन जिल्ह्याच्या सीमावर्ती असलेल्या या भागात गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या चारा छावण्या अजूनही सुरू आहेत, गावोगावी फिरणारे टँकर्स अद्यापही पिण्याचे पाणी घेऊन धावत आहेत. वळवाच्या आणि जून महिन्याच्या मध्यावर झालेल्या थोडयाफार पावसाने शेतात पेरण्या झाल्या. परंतु त्यानंतर महिनाभर केवळ ढगाळ, तर कधी ढगाळलेल्या वातावरणात पडणाऱ्या पावसाच्या चार-दोन थेंबांवरच पावसाचे चक्र थांबले आहे. ऐन पावसाळयात पडणाऱ्या थोडयाफार पावसाने इथला निसर्ग हिरवाळला आहे हे खरे असले, तरी आता मोठे पाऊस झालेच नाहीत तर? सलग चौथ्या वर्षाचा खरीपही मातीत जाणार की काय? अशा प्रश्नाने माणदेशी माणसाच्या पोटात गोळा येत आहे. वर्षानुवर्षे दुष्काळाचा कलंक माथी घेऊन जगणारी इथली माणसे, या भागात जन्माला येणे हे जणू आपले पूर्वजन्मीचे पाप आहे, अशा समजात जगत असलेले इथले लोक आणि हा माणदेशी टापू. असे का झाले? दुष्काळाचे आणि इथल्या माणसांचे नाते तरी काय आहे? कधीपासूनचा आहे हा दुष्काळाचा कलंक?  याचा नेमका आढावा घेण्याचा हा एक प्रयत्न. . .
”त्येची अशी कथा सांगत्येत मास्तर, का रामायण काळात रामलक्षिमन या भागात देव देव करत फिरत आलं. हितल्या रामघाटावर सावली बघून जेवाय बसलं अन् एकदम पाऊस आला, जोरकस आला. सगळया अन्नात पानी पानी झालं, तवा रामाला आला राग, त्येनं एक बाण मारून पावसाला पार बालेघाटात पिटाळला. तवाधरनं जो ह्या मानदेशात पाऊस नाय, तो आजपातूर. बगा तुमी, पावसाळयात आपल्या टकुऱ्यावरनं काळं काळं ढग जात्यात… जात्यात अन् पडत्यात ते बालेघाटातच.”
व्यंकटेश माडगूळकरांच्या ‘बनगरवाडी’ या कादंबरीतला रामा बनगर, कथानायक असणाऱ्या मास्तरला जणू माणदेशाच्या दुष्काळाचं जणू इंगितच सांगतो.1940च्या दशकातली ही कादंबरी, परंतु यातलं वर्णन आजच्या माणदेशालाही तंतोतंत लागू पडतं. माणदेश हा सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील मधला प्रदेश. सह्याद्रीच्या डोंगररांगांच्या पर्जन्यछायेचा हा भाग. यात सांगली जिल्ह्यातले खानापूर, आटपाडी, जत, कवठेमहांकाळ हे तालुके, सोलापूर जिल्ह्यातले सांगोला आणि मंगळवेढा, तर सातारा जिल्ह्यातले माण-म्हसवड, खटाव या तालुक्यांचा समावेश होतो.
कृष्णेसारखी सर्वात मोठी नदी केवळ 80 मैलावर असताना हा भाग पाण्यापासून हजारो, लाखो वर्षांपासून वंचित आहे. पाण्याला मराठीत ‘जीवन’ असा प्रतिशब्द आहे, तो माणदेशी जगणे भोगणाऱ्याला सर्वार्थाने सहज समजतो. या भागात पाऊस कमी, ओढे, नाले नद्यांचे प्रमाणही कमी. या भागात माणगंगा, येरळा आणि अग्रणी या तीनच मोठया नद्या आहेत. माणगंगा ही सर्वात मोठी नदी 180 किलोमीटर लांबीची. येरळा 60 किलोमीटर, तर अग्रणी 40-45 किलोमीटर लांबीची. या भागातले गेल्या 100 वर्षातले वार्षिक सरासरी पाऊसमान जरी पाहिले तरी 550 ते 600 मिलिमीटरपेक्षा ते कधीच जास्त नव्हते आणि नाही. त्यामुळे पावसाचे पाणी अडवणे आणि जिरवणे यापेक्षा जिथे पाणी आहे, त्या भागातून पाणी आणणे हा एकमेव उपाय उपलब्ध आहे.
माणदेशाच्या दुष्काळाच्या इतिहासाचा धांडोळा घ्यायचे ठरवले तर तो पार रामायण-महाभारतकाळापर्यंत घेता येईल. मात्र दुष्काळाच्या ज्ञात आणि नोंदीत असलेला इतिहास इ.स. 941पासून सुरू होतो. सलग आठ वर्षे हा दुष्काळ पडला होता. सबंध भारतवर्षात प्रसिध्द पावलेला, त्यानंतरचा 1396 ते 1407 या काळातला दुर्गादेवाचा दुष्काळ. माणदेशातल्या सर्व प्रांतांसह, गुराढोरांनाही त्या दुष्काळाची प्रचंड मोठी झळ बसली. त्यानंतर 1458 ते 1460 या काळात परत दुष्काळ पडला. या वेळी माणदेशातील मंगळवेढा प्रांतात झालेल्या एका घटनेची नोंद इतिहासात आहे. दामाजीपंत नावाचे विठ्ठलभक्त संत बिदरच्या बादशहाच्या पदरी अंमलदार म्हणून नोकरीत होते. मंगळवेढे त्या वेळी ज्वारीचे कोठार म्हणून ओळखले जात होते. त्या वेळी गोदामात प्रचंड धान्य होते. दुष्काळात अन्न-अन्न करून मरणाऱ्या गोरगरिबांची दशा दामाजीपंतांना पाहवली नाही. त्यांनी बादशहाच्या परोक्ष धान्याची कोठारे गोरगरिबांना खुली केली.
पुढे 1791 ते 1792 या काळात पुन्हा दुष्काळ पडला. ‘कवटी दुष्काळ’ या नावाने हा दुष्काळ ओळखला गेला. याच दुष्काळातून बेरोजगार लोकांना आणि शेतमजुरांना दुष्काळी कामे देऊन मोबदल्यात धान्य अगर गरजेच्या वस्तू देण्याची प्रथा सुरू झाली. 1876 ते 1878 या त्यानंतरच्या काळातल्या दुष्काळात माणदेशात पहिल्यांदा जनावरांच्या छावण्या सुरू करण्यात आल्या. पिंगळी, नेर, म्हसवड, तसेच सांगोला भागात शेकडो जनावरे मृत्युमुखी पडल्याच्या नोंदी इतिहासात आढळतात. या काळात गोंदवले येथे गोंदवलेकर महाराजांनी माणसांसाठी अन्नछत्र आणि जनावरांसाठी वैरण छावणी सुरू केली.
त्याच काळात ब्रिटिश अमदानीत राणी व्हिक्टोरियाने पिंगळी नदीवर पिंगळी तलाव आणि माणगंगा नदीपात्रात राजेवाडी तलाव (यालाच म्हसवड तलाव असे शासन दप्तरी नाव आहे) दुष्काळी कामातून बांधला, ज्याद्वारे लोकांच्या हाताला काम मिळाले, रोजगार मिळाला. त्यानंतर 1937मध्ये आटपाडी परिसरातील शेतकऱ्यांनी केवळ दुष्काळ आहे आणि तरीसुध्दा तत्कालीन इतर राज्यपध्दतीनुसार या भागात दुप्पट-तिप्पट शेतसारा आकारला जातो, म्हणून औंध सरकारविरुध्द मोर्चा काढला होता. त्या वेळी चार हजार शेतकऱ्यांनी आटपाडी ते औंध हे जवळपास 90 किलोमीटरचे अंतर पायी चालत लाँग मार्च केला. पुढच्या काळातील राजकारणावर याच मोर्चाचा परिणाम झाला. 1937 साली औंधचे राजे भवानराव पंतप्रतिनिधी यांनी वयाच्या 73व्या वर्षी मागणे मान्य झाल्याचे सांगत इथून पुढे प्रजा परिषदेच्या रूपाने जनताच संस्थानचा सारा कारभार चालवेल, अशी घोषणा केली. त्यामुळे आटपाडीकरांना प्रत्यक्ष भारत स्वतंत्र होण्यापूर्वी दहा वर्षे आधीच स्वातंत्र्य मिळाले. मात्र त्यानंतरच्या काळातही दुष्काळाने माणदेशाची पाठ सोडल्याचे दिसत नाही. 1960-62 या काळात एकीकडे महाराष्ट्र राज्य स्वतंत्र होत होते, त्या वेळीही माणदेशातले लोक पाण्यासाठी टाहो फोडत होते.
महाराष्ट्राच्या निर्मितीनंतरही पश्चिम महाराष्ट्रात वसंतरावदादा पाटील, यशवंतराव चव्हाण, राजारामबापू पाटील, अगदी पार शरद पवारांपासून अजित पवारांपर्यंत कर्तबगार राजकारण्यांची एकेक पिढी पुढे सरकत आहे. परंतु सुजलाम् सुफलाम् समजल्या जाणाऱ्या याच पश्चिम महाराष्ट्राच्या सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील हा माणदेश टापू अश्वत्थाम्याप्रमाणे हजारो वर्षांची दुष्काळाची आपली भळभळती जखम भाळी घेऊन आला दिवस ढकलत आहे.
पुढे 1972च्या दुष्काळात या भागात प्यायला पाणी होते, परंतु खायला अन्न नव्हते. टेंभ्याच्या दिव्यावर हळकुंड भाजून खायचे. हुलग्याचे माडगे खाऊन इथल्या लोकांनी बराच काळ व्यतित केल्याचे इथले वृध्द सांगतात. एकदा पंतप्रधान पंडित नेहरू दुष्काळ पाहण्यासाठी म्हसवडला आले असता, ”आम्हाला भाकरी मिळत नाही, माडगे खाऊन जगावे लागते” असे इथल्या लोकांनी त्यांना सांगितले, तेव्हा त्यांनी ”मलासुध्दा माडगे द्या” अशी मागणी केली. तेव्हा सरकारी बाबूंनी नेहरूंना माडगे दिले. पण इथले लोक जसे नुसते मीठ घातलेले माडगे खात होते, तसे न देता गूळ, तूप, वेलदोडा आणि सुका मेवा घातलेले माडगे दिले. त्यावर, ”अरे, असे इतके पौष्टिक पदार्थ तर आम्हालाही मिळत नाहीत अणि तुम्ही दररोज खाता” असे म्हणत नेहरूंनी इथल्या जनतेचे कौतुकच केले. परिणामी दुष्काळाचे गांभीर्यच निघून गेले आणि वास्तव समोर आलेच नाही, असे इथले जुने जाणकार लोक आजही सांगतात.
त्यानंतर 1983-84मध्ये दुष्काळ पडला. त्या वेळी आटपाडीत बाळासाहेब देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पाणी परिषद झाली होती. त्यात भीमेचे पाणी आटपाडीला देण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर 1992-93च्या दुष्काळात क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी हे आटपाडीत आले असता त्यांना काही पत्रकारांनी आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांनी जाणीव जागृती विचार मंचाच्या माध्यमातून पाणी प्रश्नावर मार्ग काढण्याची विनंती केली. त्यानंतरच आटपाडीसह तेरा दुष्काळी तालुक्यांची पाणी संघर्ष चळवळ सुरू झाली. एकेक तालुके वाढत गेले. चळवळ व्यापक बनली. आता या वर्षी या चळवळीला दोन दशके पूर्ण होतील. माणदेशातल्या दुष्काळी भागाला टेंभू, जिहे-काठापूर, उरमोडी या आणि अन्य योजनांचे पाणी मिळावे, यासाठी क्रांतिवीर नागनाथअण्णांचे उभे आयुष्य खर्ची पडले. परंतु या योजनांचे पाणी काही आले नाही. शासन पातळीवरही अनेक घोषणा होतात. अनेक जण या भागाला वेगवेगळया योजनांचे पाणी मिळवून देण्याचे प्रयत्न करतात. पुढे 2003-04च्या दुष्काळात राज्यपाल महम्मद फजल आणि जॉर्ज फर्नांडिस यांनीही आटपाडीच्या दुष्काळाची पाहणी केली. पण माणदेशासह आटपाडीकरांच्या नशिबात पाणी काही आलेले नाही.
माणदेशाचा संपूर्ण इतिहास दुष्काळाच्या पानांनीच भरलेला आहे आणि म्हणूनच व्यंकटेशतात्यांच्या बनगरवाडीतल्या सगळया घटना केवळ काल्पनिक म्हणताच येणार नाहीत. हजारो वर्षांपासून आपला भाग सोडून आपण आणि आपल्या मेंढया घेऊन पावसाच्या प्रदेशात वर्षातले आठ-आठ महिने जगायला जाणारे माणदेशी मेंढपाळ काय, किंवा मुंबईत गोदी कामगार म्हणून किंवा वसई भागात गवंडयाच्या हाताखाली पडेल ते काम करण्यासाठी पोटापाण्यानिमित्त जाणारे लोक काय, किंवा नोकरी-धंद्यासाठी आपला मुलूख सोडून शहरात जाऊन स्थायिक झालेले मूळचे माणदेशवासीय काय, हे केवळ माणदेशातल्या दुष्काळाचेच एक प्रकारचे बळी नाहीत का? शिवाय दुष्काळ हेच देशभरात विखुरलेल्या सोने-चांदी गलाई व्यावसायिकांच्या स्थलांतरामागचे एकमेव कारण आहे, हे कसे विसरून चालेल?
 8805008957

 

औंधच्या राजाला ...मानाचा मुजरा

" कोणताही गुन्हा करणारा माणूस हा कायमच गुन्हेगार नसतो. एखाद्या अनाहूत क्षणी, आतापर्यंत आवरलेला, सावरलेला संयमाचा बांध अचानक फुटतो....अन....खूनासारखा भयंकर गुन्हा त्याच्या हातून घडतो...तेवढा क्षण निसटला....गेला कि एरव्ही तो अन आपल्यात काहीएक फरक नसतो. नेमके हेच ज्या राजानं जाणलं....त्या औंधच्या राजाला अन त्याच्या कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी, तमाम माणदेशी माणसांच्यावातीने हा मानाचा मुजरा.....!